
उन्हाळी सुट्टय़ांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त 120 विशेष गाडय़ांची घोषणा केली आहे. या गाडय़ा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध शहरांसाठी चालवण्यात येणार आहेत. अतिरिक्त गाडय़ांमुळे यंदाच्या हंगामातील ‘समर स्पेशल’ गाडय़ांची संख्या 2012 वर पोहोचली आहे.
सीएसएमटी-मडगाव स्थानकादरम्यान साप्ताहिक विशेष गाडीच्या 18 फेऱया धावणार आहेत. 16 एप्रिल ते 11 जून या कालावधीत विशेष फेऱयांचे नियोजन केले आहे. इतर विशेष गाडय़ांमध्ये सीएसएमटी-गोरखपूर स्थानकादरम्यान 60 फेऱया, सीएसएमटी-नागपूरदरम्यान 52 फेऱया, दादर-बल्लिआदरम्यान 80 फेऱया, दादर-गोरखपूर 104 फेऱया, एलटीटी-समस्तीपूर 26 फेऱया, एलटीटी-बनारस 20 फेऱया, एलटीटी-मडगाव 18 फेऱया, एलटीटी-दानापूर 212 फेऱया, एलटीटी-सोलापूर 26 फेऱयांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पुणे, दौंड, हडपसर, सोलापूर, नागपूर येथून गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
ऐतिहासिक वास्तूला नवी झळाळी मिळणार
जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्य इमारतीच्या डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. ‘हेरिटेज बिल्डिंग’चे ऐतिहासिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तज्ञ कारागिरांची मदत घेतली जात आहे. ही वास्तू देश-विदेशातून येणाऱया असंख्य पर्यटकांच्या आकर्षणाचा पेंद्रबिंदू आहे. इमारतीवरील कलाकुसर सर्वांनाच भुरळ घालते. डागडुजीनंतर या ऐतिहासिक वास्तूला नवी झळाळी मिळणार आहे.
बायपास मोफतच, रुग्णालयांनी पैसे मागितल्यास कारवाई
राज्यात बायपास शस्त्रक्रियेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत दिली. महात्मा फुले जीवनदायी योजना आणि आयुष्मान भारत या योजनांमधून होणाऱया बायपाससाठी कोणत्याही रुग्णालयाने रुग्णाकडे पैसे मागितल्यास तातडीने माहिती द्या, संबंधित रुग्णालयावर त्वरित कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.
विधानसभेत तारांकित प्रश्नांच्या तासांत सरकारी आरोग्य योजना यासंदर्भात चर्चा रंगली. सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना आणि आयुष्मान भारत या योजनांचा अनेक रुग्णांना लाभ मिळत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
पत्नीला लोकलखाली ढकलले; पतीला अटक
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून तिची हत्या केल्याची घटना घडली. पुष्पा गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या करून गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राजू गुप्ताला कुर्ला रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. पुष्पा ही तिच्या एका नातेवाईकासह उत्तर प्रदेश येथून मुंबईत आली. तेव्हा पुष्पा आणि राजूमध्ये वाद झाला. ते तक्रार देण्यासाठी मुलुंड स्थानकात आले. त्यानंतर राजू आणि पुष्पा हे मुलुंड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक-1वर उभे होते. त्या वेळी फलाट क्रमांक-1वर लोकल येत असल्याचे पाहताच राजूने पुष्पाला ढकलून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.






























































