
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, दोन महिन्यांनंतर केंद्र सरकारला जाग आली. केंद्रीय पथकाने मंगळवारी मोहोळ तालुक्यातील कोळेगावात चक्क रात्रीच्या अंधारात टॉर्च लावून पाहणीचे नाटक केले. शेतकऱयांची ही क्रूर चेष्टाच असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोळेगावातील नुकसानीच्या पाहणी दौरा आधीपासूनच नियोजित होता. पण हे पथक पुण्याहून इतक्या उशीराने निघाले की रात्री उशीरा कोळेगावात पोहोचले. मग त्यांनी अंधारातच पाहणी उरकली.
पथक आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही
केंद्रीय पथक व राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय आंतरिक सुरक्षा माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांचे पथक आले आहे. केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यासाठी येते तेव्हा दौऱयाचा कार्यक्रम जाहीर होतो, पण यावेळेस माहिती गोपनीय ठेवली. मदत-पुनर्वसन व कृषी विभागाच्या अधिकाऱयांकडे दौऱयाबाबत विचारणा केली, पण त्यांच्याकडे कोणतीही माहिती नव्हती.

































































