
हिंदुस्थानी संघातील दिग्गज खेळाडूंच्या सहभागामुळे कधी नव्हे इतके ग्लॅमर लाभलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच साखळी सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह 22 फलंदाजांनी शतके ठोकत शतकोत्सव साजरा केला. आज झालेल्या षटकार-चौकारांसह शतकांच्या वर्षावांनी हजारे करंडकाचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज फलंदाज विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळणार असल्यामुळे या स्पर्धेच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ पाहायला मिळाली. मात्र विराट कोहलीची लढत चिन्नास्वामी स्टेडियमवर होऊ न शकल्यामुळे ती सेंटर ऑफ एक्सलन्सवर खेळविण्यात आली. तेथे प्रेक्षकांची आसनव्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे बंगळुरू क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. मात्र रोहित शर्मा खेळत असलेल्या जयपूरमध्ये क्रिकेटप्रेमींचा जनसागर उसळला होता. हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी सवाई मानसिंग स्टेडियमवर धडकले होते आणि रोहितनेही कुणाला निराश केले नाही. दुबळय़ा सिक्कीमचा संघ केवळ 7 बाद 237 धावा करू शकला. त्यामुळे मुंबईने हे लक्ष्य रोहित शर्माच्या झंझावातामुळे 31 व्या षटकांतच गाठले. रोहितने 94 चेंडूंत 18 चौकार आणि 9 षटकार खेचत 155 धावांची वादळी खेळी साकारली.
रोहितप्रमाणे विराट कोहलीनेही आंध्रविरुद्ध 101 चेंडूंत 131 धावांची वेगवान खेळी करत दिल्लीला 74 चेंडूंआधीच विजय मिळवून दिला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने घोर निराशा केली. तो केवळ 5 धावांतच बाद झाला. त्याआधी आंध्रने रिकी भुईच्या एकाकी खेळीच्या जोरावर 8 बाद 298 अशी मजल मारली होती. जी दिल्लीने 6 फलंदाजांच्या मोबदल्यातच गाठली. इशानचे शतक अपयशी ठरले
सय्यद मुश्ताक अली करंडकात झंझावाती शतक ठोकत झारखंडला जेतेपद जिंकून देणाऱया इशान किशनने 33 चेंडूंत शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला. जो सकीबुलने काही मिनिटांनीच मोडीत काढला. पण इशानने 39 चेंडूंत 14 षटकार आणि 7 चौकार खेचत 125 धावांची अतिआक्रमक खेळी करत झारखंडला 9 बाद 412 धावांपर्यंत नेले. पण कर्नाटकने देवदत्त पडिक्कलच्या 147 धावांच्या खेळीच्या मदतीने विजयी लक्ष्य 15 चेंडू आणि 5 विकेट राखून गाठले.
शतकी खेळींचा दिवस
हिंदुस्थानी संघातील रोहित, विराटसह आज 22 जणांनी शतके साजरी केली. यात विदर्भच्या अमन मोखाडे (110) आणि ध्रुव शोरी (136) यांनी शतके साजरी करत विदर्भला 5 बाद 382 अशी आव्हानात्मक मजल मारून दिली. पण बंगालने एकही शतक न झळकावताच सात चेंडू राखत विजयी लक्ष्य गाठण्याची करामत केली. बंगालच्या विजयात अभिषेक पोरेल, अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार आणि शाहबाज अहमद या चौघांनी अर्धशतकी खेळी साकारल्या. दिग्गज खेळ्यांसह यश दुबे, फिरोइजम जोतिन, अर्पित भटेवरा, किशन लिंगडोह, विष्णू विनोद, शुभम खजुरिया, स्नेहल कवठणकर, हिमांशु राणा आणि रवी सिंग या फलंदाजांनीही शतकी खेळी करत बॅट उंचावली.
शतकांच्या हॅटट्रिकसह विक्रमांचा पाऊस
प्लेट गटात खेळत असलेल्या बिहारने कमकुवत अरुणाचल प्रदेशविरुद्ध चौकार-षटकारच नव्हे तर वेगवान शतके आणि विक्रमांचाही पाऊस पाडला. वैभव सूर्यवंशी (190), आयुष लोहरुका (116) आणि कर्णधार सकीबुल गनी (नाबाद 128) यांच्या वेगवान आणि झंझावाती शतकांच्या पराक्रमामुळे 574 धावांचा एव्हरेस्ट उभा केला. 38 षटकार आणि 49 चौकारांची आतषबाजी करणाऱ्या बिहारसाठी वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूंतच शतक ठोकले. त्याने आपल्या 84 चेंडूंच्या खेळीत 16 चौकार आणि 15 षटकार खेचले. तो बाद होत नाही तोच कर्णधार सकीबुल गनीने 32 चेंडूंत शतक झळकावण्याचा नवा विक्रम रचला. हे हिंदुस्थानी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान तर क्रिकेट विश्वातील तिसरे वेगवान शतक ठरले. त्याने 40 चेंडूंत 128 धावा करताना 10 चौकार आणि 12 षटकार खेचले. लोहरुकानेही 56 चेंडूंत 116 धावा चोपल्या. या विक्रमानंतर बिहारच्या गोलंदाजानी अरुणाचल प्रदेशचा डाव 42.1 षटकांत 177 धावांवरच संपवला आणि 397 धावांचा महाप्रचंड विजय नोंदवला.
स्वस्तिक समालचे द्विशतक वाया
ओडिशाने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात स्वस्तिक समालच्या 212 धावांच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 6 बाद 345 धावांचा डोंगर उभारला होता. समालने आपल्या 169 चेंडूंच्या खेळीत 21 चौकार आणि 8 षटकारांची बरसात केली. त्याने कर्णधार बिप्लव समांत्रयबरोबर चौथ्या विकेटसाठी 261 धावांची विक्रमी भागी रचली. बिप्लवनेही 100 धावांची खेळी साकारली, पण या दोघांची शतके आणि 346 धावांचे आव्हान सौराष्ट्रने समर गुज्जरच्या 132 धावांच्या अभेद्य खेळीमुळे 7 चेंडू आधीच गाठले. चिराग जानीच्या 55 चेंडूंतील 86 धावांच्या खेळीने सौराष्ट्रला पाच विकेटनी दणकेबाज विजय मिळवून दिला.





























































