सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत

हिंदुस्थानी वंशाचे आणि गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांचा जगातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सुंदर पिचाई हे कोणत्याही कंपनीचे संस्थापक अथवा मालक नाही, तर ते केवळ गुगल कंपनीचे सीईओ आहेत. तरीही त्यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे ही मोठी गोष्ट आहे. सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वात गुगलने आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने आपला तिमाही अहवाल प्रसिद्ध केला आहे. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा नफा 2.35 लाख कोटी रुपये होता, तर उत्पन्न 8.04 लाख कोटी रुपये होते.

91.42 कोटी रुपये पगार

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी म्हणून गुगलकडे पाहिले जाते. या कंपनीचे सीईओ असलेले सुंदर पिचाई यांना 2024 मध्ये 10.73 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 91.42 कोटी रुपये वार्षिक पगार मिळाला आहे. 2023 मधील पगाराच्या तुलनेत त्यांचा हा पगार 22 टक्के जास्त आहे. गुगलची कंपनी अल्फाबेटने ही माहिती दिली आहे. 2024 मध्ये सुंदर पिचाई यांच्या सुरक्षेवर 70.47 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुरक्षा पॅकेजेसमध्ये घराच्या देखरेखीपासून ते प्रवासाच्या संरक्षणापर्यंत आणि अगदी वैयक्तिक ड्रायव्हर्सपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.