बॅग पॅकर्स – कुआरी पास

>> चैताली कानिटकर

हिमालयाच्या कुशीत लपलेला कुआरी पास म्हणजे निसर्गाने स्वत लिहिलेली एक आख्यायिकाच. गढवालच्या उंच शिखरांमधला हा ट्रेक रानवाटा, ढगांतून झिरपणाऱया सूर्यप्रकाशाची सोबत करीत निसर्गाचा आगळा अनुभव देतो. हा ट्रेक 6 दिवसांचा असून उंची 12600 फूट आहे. हा हिवाळ्यात केल्या जाणारा ट्रेक मध्यम स्तरात मोडतो. ट्रेकचा पहिला दिवस ऋषीकेश ते पिपलकोटी आहे. हे अंतर ड्राइव्हने असून बद्रीनाथच्याच रस्त्याने सुरू होते. दुसऱया दिवशी पिपलकोटी ते तुगासी हा प्रवास पुन्हा ड्राइव्ह आहे व तुगासी ते गुलिंग टॉप ट्रेक आहे. येथे आपण साधारण 9400 फुटांवर पोहोचलेले असतो. चढाई करताना धौली-गंगा नदी आणि दूरवर विष्णुगड-तपोवन जलविद्युत केंद्राचे दर्शन, द्रोणागिरी शिखराचे दर्शन होते. कॅम्पसाईटला पोहचल्यावर द्रोणागिरी, हाथी पर्वत आणि गौरी पर्वत, ब्रह्मल शिखर मन प्रसन्न करते. ट्रेकचा तिसरा दिवस आरामदायी असून गुलिंग टॉप ते ताली फॉरेस्ट कॅम्प साधारण 5-6 तासांचा ट्रेक आहे. तालीच्या शांत जंगलातील हे निसर्गरम्य हायकिंग आहे. इथून नंदा देवी, कलंका, चांग बंग आणि हाथी पर्वत, गौरी पर्वत यासारख्या बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य नजरेस पडते. ओक, रोडोडेंड्रॉन आणि अक्रोडाची झाडे हे या ट्रेलचे विशेष. पुढील दिवस ट्रेकचा सर्वात आव्हानात्मक दिवस. ताली फॉरेस्टपासून 2 किलोमीटर ट्रेकिंग केल्यानंतर झांडी टॉप आणि पुढे खुल्लारा टॉप ठिकाण येते. इथे एक विस्तीर्ण, लँडस्केप आहे. हिवाळ्यात हा भाग पूर्ण गोठलेला असतो. कुआरी खिंडीजवळ जाताना केदारनाथ शिखर, चौखंबा, नीलकंठा आणि नंदा देवी या शिखरांचे दर्शन घडते. पुढचा ट्रेक करताना बर्फाचा अंदाज घेऊन ट्रेक लिडर मार्ग ठरवतात. साहसाचा पुढचा भाग म्हणजे गुरसन बुग्यालचा 3.5 किमीचा ट्रेक. इथून पुढे स्किइंग डेस्टिनेशन औलीपर्यंतचा प्रवास सौम्य आणि आल्हाददायक आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत जेव्हा बर्फ वितळू लागतो तेव्हा इथला निसर्ग अधिक सुंदर दिसतो. कुआरी पास ट्रेकचा शेवटचा ट्रेक पिपलकोटी हा लांबवरचा प्रवास आहे. योग राजधानी म्हणून ओळखले जाणारे ऋषीकेश या ट्रेकचा शेवट आहे. शांत नदीकाठी असलेले घाट, मंदिरे आणि आश्रम पाहण्यासाठी एखादा अधिक दिवस हवाच. हा परतीचा प्रवास या ट्रेकच्या अनुभवांसह पुढच्या ट्रेकसाठी ऊर्जा देतो.
[email protected]