
न्यूझीलंडच्या संघामध्ये सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा आहे. न्यूझीलंडच्या संघातील प्रत्येक खेळाडू हा पूर्ण समर्पणाने सामन्यात झोकून देऊन क्रिकेट खेळतो. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी उपांत्य किंवा अंतिम सामन्यात दिसतो. त्यामुळे हिंदुस्थानने न्यूझीलंडला कमी समजू नये आणि हलक्यातही घेऊ नये, असा सल्ला इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने टीम इंडियाला दिला आहे.
‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार येत्या रविवारी दुबई येथे रंगणार आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीत न्यूझीलंडला नमवून हिंदुस्थानने दिमाखात उपांत्य फेरीतील प्रवेश करत गटामध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील द्वंद्व क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने हिंदुस्थानी संघाला सल्ला दिला आहे. तो म्हणाला, किवी संघ वाटतो तितका सोप्पा नाही. हिंदुस्थान जरी दुसऱ्यांदा न्यूझीलंडविरुद्ध भिडणार असला तरी त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यांना कमी लेखूनही खेळू नये. न्यूझीलंडचा संघ सहजासहजी हार मानणारा नाही. त्यांच्या संघात सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा आहे. हे सर्व खेळाडू सामन्यात झोकून देऊन क्रिकेट खेळतात. त्यामुळे हिंदुस्थानने सावध राहिले पाहिजे. न्यूझीलंडच्या संघात उत्तम कामगिरी करणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंचे मिश्रण आहे. केन विल्यमसन, रचिन रवींद्र हे दोन प्रतिभावान खेळाडू कधीही दगा देऊ शकतात.