व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर दोषी, कर्ज मंजूर करण्यासाठी 64 कोटी घेतले!

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्जाच्या बदल्यात लाच घेतल्याप्रकरणी अपीलीय न्यायाधिकरणाने त्यांना दोषी ठरवले आहे. कोचर यांनी व्हिडिओकॉन कंपनीला 300 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात 64 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे.

चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांच्या माध्यमातून ही लाच घेतली होती. चंदा कोचर यांनी 27 ऑगस्ट 2009 रोजी व्हिडिओकॉनला 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यांच्या पुढच्याच दिवशी व्हिडिओकॉन समूहाच्या एसईपीएल या कंपनीने दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेड (एनईपीएल) या कंपनीला 64 कोटी दिले. कागदावर एनईपीएल ही कंपनी व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांची असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात दीपक कोचर यांच्याकडेच या कंपनीचा ताबा होता. ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

व्यावसायिक हितसंबंध लपवले!

चंदा कोचर या आयसीआयसीआयच्या कर्ज मंजूर करणाऱ्या समितीवर होत्या. त्यावेळी त्यांनी कर्ज घेणाऱ्या व्हिडिओकॉन आणि त्यांच्या पतीचे व्यावसायिक संबंध असल्याचे उघड केले नाही. असे करून त्यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाही लवादाने ठेवला आहे. जानेवारी 2019 मध्ये सीबीआयने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात फसवणूक व घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने चंदा कोचर यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. ईडीच्या आरोपांवर आज अपिलीय न्यायाधिकरणाने शिक्कामोर्तब केले.