
थरारालाही घाम फुटेल अशा सामन्यात चंदिगडने हरयाणाचा दुसऱ्या सुवर्ण चढाईत पराभव करत पहिल्या युवा (18 वर्षांखालील) राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटाचे जेतेपद पटकावले. मुलींच्या गटात मात्र हरयाणाने राजस्थानचा संघर्ष 39-35 असा मोडीत काढत अजिंक्यपदाला गवसणी घातली. दोन्ही गटाचे अंतिम सामने अंगावर शहारे आणणारे ठरले. मुलांमध्ये हरयाणा प्रंचड पिछाडीवर होता, मात्र उत्तरार्धात त्यांनी जोरदार खेळ करत सामना अनपेक्षितपणे 40-40 असा बरोबरीत सोडवला. मग पाच-पाच चढाया झाल्या. सुवर्ण चढाई झाली. दोन्ही बरोबरीत सुटल्या आणि दुसऱ्या सुवर्ण चढाईत चंदिगडने बाजी मारली.
त्याआधी महाराष्ट्राच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत, तर मुलांचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत गारद झाला. मुलांच्या गटात हरयाणा, गोवा, साई आणि चंदिगड तर मुलींच्या गटात राजस्थान, तामीळनाडू, हरयाणा आणि साई या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात राजस्थानने महाराष्ट्राचा प्रतिकार 52-32 असा मोडून काढला. मुलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राला हिमाचल प्रदेशविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेला हा खेळ महाराष्ट्राला 40-41 असा गमवावा लागला आणि उपउपांत्यपूर्व फेरीतच परतीचा प्रवास करावा लागला. विश्रांतीला 21-17 अशी हिमाचलकडे आघाडी होती. पण विश्रांतीनंतर सामन्यात चुरस पहावयास मिळाली. सामन्याच्या शेवटच्या चढाईत महाराष्ट्राच्या खेळाडूने चढाईत गडी टिपत सामना 40-40 असा बरोबरीत आणला. पण तीन मिनिटापूर्वी महाराष्ट्राने खेळाडू बदली करताना त्यांचा खेळाडू चुकीच्या पद्धतीने आत आला. त्यामुळे पंचांनी सामना संपल्यानंतर तांत्रिक गुण हिमाचलला बहाल केला. यामुळे जाणीवपूर्वक हे करण्यात आले.