
‘मी तत्त्वाने लढले, म्हणून माझा पराभव झाला,’ अशा शब्दांत चंद्रपूर महापालिकेच्या भाजपच्या माजी महापौर अंजली घोटेकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अंजली घोटेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्षातीलच काही सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी पक्षनिष्ठा बाजूला सारून केवळ स्वतःचा स्वार्थ बघितला, त्यामुळेच ते विजयी झाले. मी मात्र सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली आणि त्यातच माझा घात झाला’, असा थेट आरोप त्यांनी स्वपक्षातील विजयी उमेदवारांवर केला आहे.
केवळ स्वार्थापोटी निष्ठा बदलणाऱ्यांमुळे आपला पराभव झाल्याचे सांगत, त्यांनी पराभवानंतरही आपल्या तत्त्वाशी तडजोड केली नसल्याचे अधोरेखित केले आहे. त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून, यावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





























































