
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर पक्षांतर्गत विरोधक त्यांना आव्हान देऊ लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार किर्ती भांगडीया यांचा उद्या 19 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक झळकावले. मात्र या एकाही बॅनर – पोस्टरवर ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो तर सोडा, साधा उल्लेखही नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
आमदार भांगडिया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. मंत्रीमंडळात वर्णी लागावी, यासाठी भांगडिया प्रयत्नात आहेत, पण मुनगंटीवार यांच्यासारखा मोठा नेता मंत्री असल्याने भांगडिया यांची डाळ आतापर्यंत शिजू शकली नाही. शिवाय भांगडिया आणि मुनगंटीवार यांच्यातील राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. पण आता लोकसभेत मुनगंटीवार यांचा मोठा पराभव झाल्याने भांगडिया सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्याची राजकीय सूत्रे आपल्या हातात यावी, यासाठी ते प्रयत्नरत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात लागलेले वाढदिवसाचे फलक, हा त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.