Chandrapur News – जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

अभियंता दिनाचे औचित्य साधत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, चंद्रपूरात चक्क जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहात अभियंत्यांनी दारूत भिजून अभियंता दिन साजरा केला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही ओली पार्टी उधळून लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे पाच ते सहा अभियंते जिल्हा परिषदेच्या वसंत भवन या शासकीय विश्रामगृहात ओली पार्टी करत असल्याची माहिती ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार आपचे पदाधिकारी वसंत भवनामध्ये गेले असता खोली क्रमांक 107 मध्ये अभियंते ओली पार्टी करत असल्याचे दिसून आले. शासकीय इमारतीत हे अभियंते दारू ढोसत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वसंत भवन ही वास्तू जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे निवासस्थान असून सरकारी मालमत्ता आहे. त्यामुळे या शासकीय इमारतीत दारू ढोसणे हे गैर कृत्य आहे. आपच्या पदाधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आणि याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. तसेच त्यांना घटनास्थळी येण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी व्हॉट्सअॅपवर माहिती पाठवा असे सांगून घटनास्थळी येण्याचे टाळले, अशी माहिती आपने दिली. दरम्यान यासंदर्भात, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.