
गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत विशेष अधिवेशनादरम्यान भाजप आमदार आणि मार्शलमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीनंतर भाजप आमदार आणि मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्यासह पाच आमदारांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये मुख्य प्रतोद शंकर घोष, अग्निमित्र पाल, मिहिर गोस्वामी, अशोक दिंडा आणि बंकिम घोष यांचा समावेश आहे.
या पाच जणांना सभागृहाच्या उर्वरित कामकाजातून एका दिवसासाठी म्हणजेच गुरुवारी निलंबित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर मार्शलना पाचारण करावे लागले. यावेळी भाजप आमदारांनी त्यांच्याशी हाणामारी केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.