अकरा मान्यवरांना चतुरंगचा सुवर्णरत्न सन्मान

चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा 28-29 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईमध्ये होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील 11 नामवंतांना चतुरंग सुवर्णरत्न सन्मान प्रदान केला जाणार आहे. चतुरंगने आतापर्यंत सुमारे 1800 हून अधिक कार्यक्रम केले आहेत. हे कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने साकार करता आले अशा 11 क्षेत्रांतील नामवंत – गुणवंतांचा भव्य असा जाहीर सन्मान करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे.

या सन्मानासाठी पंडित उल्हास कशाळकर (गायन), पंडित हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन), बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे (राष्ट्रीय सुरक्षा) अशी अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण 33 निवड समिती सदस्यांनी काम पाहिलेले आहे.