हिंदुस्थानी हवाई दलाच्या 92 व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईच्या मरीना बीच येथे एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. मरिना बीचवर रविवारी आयोजित करण्यात आलेला ‘एअर शो’ आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. एअर शो बघण्यासाठी प्रचंड गर्दी झालाी होती. यादरम्यान एक दुर्घटना घडली. एअर शो संपल्यानंतर तेथे धावपळ सुरू झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. यापैकी 40 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेथील अधिकाऱ्यांमध्ये गर्दी हाताळण्याचे नियोजन नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. मरीना बीचवरील एअर शो पाहण्यासाठी तब्बल 16 लाख लोकांची गर्दी जमली होती. हा शो सकाळी 11 सुरू होणार होता. मात्र लोकांनी सकाळी 8 वाजल्यापासूनच तेथे रांगा लावायला सुरुवात केली होती. भर ऊनात या शोचे आयोजन केल्यामुळे अनेक वृद्धांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.
हळूहळू मरीना बीचवर गर्दी वाढू झाल्याने आजूबाजूच्या सगळ्या पाणी विक्रेत्यांना हटवण्यात आले. त्यामुळे उपस्थितांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. शो संपल्यानंतर लोकांनी तेथून काढता पाय घेतला. यादरम्यान रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ऊन आणि गर्दीने कंटाळलेले अनेक लोक रस्त्याच्या कडेला बसले. या दरम्यान लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. यात अनेक लोक जखमी झाले . त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.