
भाजप कार्यालयाच्या वास्तुशांतीला ‘भाऊबंदकी’चा प्रयोग रंगला. माजी नगरसेवक आणि मिंधे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे हितचिंतक समीर राजूरकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून करण्यात आलेली नियुक्ती भाजप पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडली नाही. त्यातच वास्तुशांतीचे यजमानपद ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे निष्ठावंत अनिल मकरिये यांना देण्यात आल्याने भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळासमोरच भाजपने आलिशान कार्यालय बांधले आहे. या कार्यालयाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी कार्यालयाची विधिवत वास्तुशांत करण्यात आली. वास्तुशांतीच्या विधीचे यजमानपद अनिल मकरिये यांना
देण्यात आल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. ओबीसी मंत्री अतुल सावे जिल्हा भाजपचा सातबारा त्यांच्याच नावावर असल्याच्या आविर्भावात वावरतात. भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर निर्णय लादतात, अशा तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असल्यामुळे सावेंच्या मनमानीला चाप लावला जात नाही, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. वास्तुशांतीचे यजमानपद शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना मिळणे अपेक्षित असताना त्यांना डावलून अनिल मकरिये यांना देण्यात आले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती.
राजूरकरांच्या निवडीवरुन थयथयाट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली.
राजुरकरांची नियुक्ती होताच भाजपमधील अंतर्गत खदखद उफाळून आली. मुळात राजूरकर हे भाजपमध्ये कधी आले, ते तर मिंधे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे हितचिंतक समजले जातात. त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याचे कारण काय, असा सवाल करत अतुल सावे, संजय केणेकर यांनी या निर्णयाला विरोध केला होता. समीर राजूरकर आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यातून विस्तव आडवा जात नाही. मग निवडणुका जिंकणार कशा? असा प्रश्नही करण्यात आला आहे. याच रागातून सावे यांनी वास्तुशांतीचे यजमानपद अनिल मकरिये यांना दिले.
मराठा विरुध्द ओबीसी वाद
भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील बेदिली, बेशिस्त, अरेरावी पाहून सर्वसामान्य कार्यकर्ता थक्क झाला आहे. समीर राजूरकर यांच्या नियुक्तीमुळे भाजपमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी दुफळी माजली आहे. संघ परिवाराशी असलेल्या जवळिकीचा गैरफायदा घेत राजूरकर यांनी निवडणूक प्रमुख पद पदरात पाडून घेतल्याची सावे, केणेकर गटाची तीव्र भावना आहे. त्यामुळे राजूरकरांच्या वाटेत काटे पेरण्याचे काम पद्धतशीरपणे चालू आहे. किशोर शितोळे हे भाजपमध्ये स्वतंत्र संस्थान निर्माण झाले आहे. ही भाऊबंदकी पाहून सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता भांबावून गेला आहे.



























































