
मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक बब्रूवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे आज (14 डिसेंबर 2025) रविवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील प्रतापनगर स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
मराठवाडी ग्रामीण बोलीतील अस्सलपणा, उपरोधिक विनोद आणि सामाजिक-राजकीय वास्तवावरची निर्भीड मांडणी ही बब्रूवान रूद्रकंठावार यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. ‘पुन्यांदा चबढब’, ‘टर्र्या, डिंग्या आन् गळे’, ‘आमादमी विदाऊट पार्टी’, ‘न घेतलेल्या मुलाखती’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. व्यवसायाने पत्रकार असलेल्या बब्रूवान यांनी दीर्घकाळ वृत्तपत्रातून सदरलेखन केले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याने एक स्पष्टवक्ते, प्रयोगशील आणि समाजभान असलेला लेखक गमावला असल्याची भावना साहित्यिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
बब्रूवान रुद्रकंठावार यांनी लिहिलेली पुस्तके
आमादमी विदाऊट पार्टी, चौथ्या इस्टेटच्या बैलाला, टर्र्या, डिंग्या आन् गळे, न घेतलेल्या मुलाखती, पुन्यांदा चबढब, बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी.
रुद्रकंठावार यांना मिळालेले पुरस्कार
टर्र्या, डिंग्या आन् गळे या पुस्तकाला बी. रघुनाथ आणि वि.मा.दी. पटवर्धन हे पुरस्कार तर आमादमी विदाऊट पार्टी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’ हे ‘बब्रू’चे गाजलेले नाटक
धनंजय चिंचोलीकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचोली-लिंबाजी येथील त्यांनी बब्रूवान नावाने लिहण्यास सुरवात केली, त्यांच्या अस्सल मराठवाडी भाषेतील निर्भीड राजकीय आणि सामाजिक लेखनामुळे मराठी साहित्यविश्वात गाजले. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे ११ जानेवारी १९६५ रोजी जन्मलेल्या बब्रूवान यांनी बी.ए. आणि पत्रकारिता (बी.जे.) पर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी ‘तरुण भारत’ दैनिकातून पत्रकार म्हणून दीर्घकाळ काम केले. ‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’ हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. बाळासाहेब ठाकरे, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन अशा सतरा व्यक्ती आणि तीन प्राण्यांच्या कल्पित मुलाखती असलेले त्यांचे ‘न घेतलेल्या मुलाखती’ हे पुस्तक विशेष गाजले. त्यांच्या लेखनामुळे मराठवाडी बोलीला संशोधन सामग्री म्हणून अभ्यासता येईल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत यांनी नोंदवले होते


























































