
छत्रपती संभाजीनगरात दोन बिबटे घुसले आहेत! त्यापैकी एका बिबट्याने दाट लोकवस्तीच्या उल्कानगरीत तीन दिवसांपासून मुक्काम ठोकला असून दुसर्या बिबट्याने थेट प्रोझोन मॉल गाठला. बिबट्याच्या दहशतीपोटी बालवाडी, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. उल्कानगरीतलाच बिबट्या सतत हुलकावणी देत असल्यामुळे हैराण झालेल्या वन विभागासमोर दुसर्या बिबट्याचे संकट उभे राहिले आहे.
मॉलमध्ये बिबट्याची ‘विंडो शॉपिंग’; वनविभागाचे जवान शोधून शोधून हैराण#chhatrapatisambhajinagar #leopard #viralvideo pic.twitter.com/GmegOuR8Br
— Saamana (@SaamanaOnline) July 18, 2024
रविवारच्या रात्री अचानक बिबट्या शहराच्या भरवस्तीत उल्कानगरीमध्ये अवतरला. मध्यरात्री फ्यूज बसवण्यासाठी आलेल्या दोन लाईनमनना तो दिसला. भरवस्तीत बिबट्या स्वैर संचार करत असल्याचे कळाल्यावर वन विभागाची धावाधाव झाली. सोमवारी दिवसभर या भागात ‘बिबट्यापुराण’ चालू होते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांना उधाण आले. बिबट्याच्या दहशतीमुळे या भागातील बालवाड्या, शाळांना सुट्टी देण्यात आली. सोमवारी बिबट्याला पकडण्यासाठी झुडुपांमध्ये तीन पिंजरे लावण्यात आले. बिबट्याला आमिष दाखवण्यासाठी या पिंजर्यांमध्ये बकर्या ठेवण्यात आल्या. वन विभागाचे कर्मचारी लाठ्याकाठ्या घेऊन उभे राहिले. खास जुन्नर, नाशिक येथून आलेले नेमबाज ‘शॉट’ रोखून सज्ज होते. परंतु हा बिबट्या सर्वांच्या हातावर तुरी देऊन गायब झाला. तो आज पहाटे देवानगरी भागातील नाल्याच्या काठावर फिरताना पुन्हा सीसीटीव्हीत कैद झाला.
प्रोझोन मॉलमध्ये दुसर्या बिबट्याची विंडो शॉपिंग
उल्कानगरीतील बिबट्यानेच वन विभागाच्या तोंडाला फेस आणला असतानाच पहाटे चार वाजता प्रोझोन मॉलच्या पार्विंâगमध्ये बिबट्या मॉर्निंग वॉक करत असल्याचे दिसून आले. उल्कानगरीत मुक्कामी असलेला बिबट्याच प्रोझोनमध्ये पोहोचला असावा, अशी चर्चा सुरू झाली. वन विभागाचे कर्मचारी हातात दांडके घेऊन प्रोझोन मॉलमध्ये पोहोचले. मॉलची अवाढव्य पार्विंâग, आजूबाजूचा परिसर पालथा घालण्यात आला. परंतु बिबट्याने काही दर्शन दिले नाही. विशेष म्हणजे मॉलच्या परिसरात बिबट्याचा शोध सुरू असताना मॉल मात्र बिनधास्त चालू होता. अचानक दुपारी या बिबट्याने पुन्हा सीसीटीव्हीत दर्शन दिले.
वन विभागाची प्रोझोन मॉलमधून देवानगरीत वरात
गुरुवारी पहाटेपासून वन विभागाचे कर्मचारी प्रोझोन मॉलमध्ये बिबट्याचा शोध घेत होते. सायंकाळच्या वेळेस उल्कानगरीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या देवानगरीत नाल्याच्या काठावर बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वन विभागाची वरात प्रोझोनमधून देवानगरीत दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत या भागात बिबट्याचा शोध घेण्यात येत होता.
नागरिकांचे जागते रहो… डबेही वाजवले
उल्कानगरीतील नागरिकांचे बिबट्याच्या भीतीने तीन दिवसांपासून जागरण सुरू आहे. ऑगस्ट होम, खिंवसरा पार्क या उच्चभ्रू वसाहतींमध्ये नागरिकांनी गस्त घातली. बिबट्याला पळवण्यासाठी फटाके, डबे वाजवले… पण बिबट्या काही प्रत्यक्ष अवतरला नाही