आजपासून छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेन धावणार; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

मध्य रेल्वेवर सोमवारपासून ’छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ धावणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांच्या जीवनकार्याचे दर्शन देश-विदेशातील सर्व जनतेला व्हावे यासाठी पर्यटकांच्या सेवेत ही विशेष ट्रेन दाखल करण्याची आग्रही मागणी शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसीने ट्रेन सुरू केली आहे. या ट्रेनला सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असून ट्रेनमधील पर्यटकांना पुढील पाच दिवस शिवकालीन गडकिल्ले तसेच इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी तसेच शिवरायांच्या गौरवशाली जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ’छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ची घोषणा केली आहे. ही ट्रेन सुरु करण्याबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आयआरसीटी, मध्य रेल्वे आणि केंद्र सरकार पातळीवर पाठपुरावा सुरु ठेवला होता. शिवसेनेची मागणी मान्य करून ही ट्रेन 9 जून रोजी सकाळी 6.30 वाजता पर्यटकांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे. सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष हजर राहून, तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ट्रेनच्या उदघाटन सोहळ्याचे खास निमंत्रण शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना देण्यात आले आहे. ही ट्रेन सर्वप्रथम माणगाव स्थानकात पोहोचणार असून तेथून पर्यटकांना रायगड किल्ल्यावर नेले जाणार आहे.