चारित्र्याच्या संशयावरून संतापलेल्या युट्युबरने केली पित्याची निर्घृण हत्या; छत्तीसगडमधील कोरबा हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका 25 वर्षीय तरुणीने आपल्या पोटच्या वडिलांची विळ्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलांकडून वारंवार होणारा चारित्र्याचा संशय आणि छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गीता केवट असे आरोपी तरुणीचे नाव असून, ती सोशल मीडिया आणि युट्युबवर सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गीताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय अशोक केवट हे रलिया गावात एकटेच राहत होते, तर त्यांची पत्नी आणि मुली कोरबा शहरातील जुनी वस्ती परिसरात वेगळ्या राहत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून केवट कुटुंबात तीव्र संघर्ष आणि तणाव होता. वडील आणि मुलीमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत असल्याने त्यांचे संबंध कमालीचे ताणलेले होते. सोमवारी गीता केवट काही कागदपत्रांच्या कामासाठी रलिया गावात आली होती. ती तिच्या मामाच्या घरी थांबली असताना, रात्री दोनच्या सुमारास ती वडील अशोक केवट यांच्या घरी पोहोचली.

अशोक केवट गाढ झोपेत असताना गीताने त्यांच्यावर धारदार विळ्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की अशोक यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा जीव घेतल्यानंतर गीता अत्यंत थंड डोक्याने पुन्हा मामाच्या घरी परतली आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून शांतपणे झोपली. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हरदी बाजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून हत्येसाठी वापरलेला विळा जप्त केला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल पटले यांनी सांगितले की, कौटुंबिक वादातून आणि वडिलांकडून वारंवार होणाऱ्या चारित्र्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचे दिसत आहे. गीता सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत असे, ज्यावरून वडील तिला टोकत असत. पोलिसांनी गीताला ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक बाजूने तपास करत असून गीताचे कॉल डिटेल्स आणि तिच्या मानसिक स्थितीचाही अभ्यास केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.