
येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) च्या गोविंदा रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती फ्राइड चिकन खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे रेस्टॉरंट पूर्णपणे शाकाहारी असताना ही व्यक्ती मुद्दाम येथे येऊन चिकन खात असल्याचा प्रकार उघड झाल्याने सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
व्हिडीओमध्ये आफ्रिकन ब्रिटिश वंशाची एक व्यक्ती गोविंदा या इस्कॉनच्या अत्यंत प्रसिद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये दाखल झाली. त्यानंतर त्याने कर्मचाऱ्यांना येथे मांसाहारी पदार्थ मिळतात का? अशी विचारणा केली. कर्मचाऱ्यांनी येथे मांस, कांदा किंवा लसून मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पिशवीतून केएफसीची चिकन बकेट बाहेर काढली आणि चिकन खाऊ लागला. हा प्रकार पाहताच कर्मचारी त्याच्यावर ओरडताना आणि त्याला बाहेर जायला सांगताना व्हिडीओत दिसत आहेत. या व्यक्तीविरोधात नेटकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.