
सध्याच्या डिजिटल युगात मुली सर्वाधिक असुरक्षित आहेत. तंत्रज्ञान हे सक्षमीकरणाचे नव्हे तर शोषणाचे साधन बनले आहे, अशी चिंता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समिती आणि युनिसेफ इंडियाने आयोजित केलेल्या मुलींचे संरक्षण या राष्ट्रीय परिषदेत सरन्यायाधीश गवई यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डिजिटल युगात मुलींना अधिक धोके आहेत. ऑनलाईन छळ, सायबरबुलिंग, डिजिटल स्टॉकिंग, वैयक्तिक डेटाचा गैरवापर व डीपफेफचे मुलींसमोर मोठे आव्हान आहे. संवैधानिक हमी असूनही अनेक मुलींना आजही मूलभूत हक्क आणि सन्मान नाकारला जातो. ही परिस्थिती त्यांना लैंगिक शोषण, मानवी तस्करी, बालविवाह आणि भेदभावाच्या परिस्थितीत ढकलते, असे ते म्हणाले.
पोलिसांनी संवेदनशील व्हावे
डिजिटल छळाच्या प्रकरणात पोलिसांना समजूतदारपणा दाखवायला हवा. अशा घटना संवेदनशीलतेने हाताळायला हव्यात. यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण द्यायला हवे, असेही सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले.