
चीनमध्ये फटाक्यांच्या दुकानात स्फोट, 8 ठार
चीनमध्ये न्यू ईयर म्हणजी लूनरची उत्सुकता असताना फटाक्यांच्या दुकानात झालेल्या स्फोटामध्ये 8 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन लोक किरकोळ भाजले आहेत. हा स्फोट जिआंगसू प्रांतातील डोंगहाई काउंटीमधील एका गावात झाला. एका रहिवाशाने फटाक्याच्या दुकानाजवळ चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
मैथिली ठाकूरच्या आईचे दागिने चोरीला
बिहारमधील भाजप आमदार आणि प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरची आई भारती ठाकूर यांची पर्स चोरीला गेली. या पर्समध्ये हिरेजडित दागिने आणि महागडे घडय़ाळ यासह अन्य काही महत्त्वाच्या वस्तू होत्या. या सामानाची किंमत लाखोच्या घरात आहे. भारती ठाकूर एका बैठकीत सहभागी होण्यासाठी लालापट्टीला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपली पर्स गाडीत ठेवली होती. बैठकीतून परतल्यानंतर पर्समधील दागिने आणि घडय़ाळ गायब होते. भारती ठाकूर यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करून चोराला लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
सिंगापुरात हिंदुस्थानी व्यक्तीला तुरुंगवास
सिंगापूरमध्ये राहात असलेल्या मूळच्या हिंदुस्थानी नागरिकाला पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ओम कुमार राय (42) असे या आरोपी व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीवर महिलेचा छेडछाड केल्याचा आरोप आहे. 17 जून 2025 रोजी सकाळी आरोपी व्यक्तीने 22 वर्षीय महिलेशी संपर्क केला. ही व्यक्ती या महिलेच्या वडिलांचा सहकारी होती. या व्यक्तीने या महिलेला बोलण्याच्या बहाण्याने बोलावले आणि विनयभंग केला.
मणिपुरात 2 नक्षलवादी महिलांना अटक
मणिपुरात सुरक्षा दलांनी नक्षलवादी दोन महिलांना अटक केली आहे. ही अटक इन्फाळ पूर्व आणि इन्फाळ पश्चिम जिह्यातून करण्यात आली आहे. सनासम ओंगमी संतिकुमारी देवी (29) असे या महिलेचे नाव असून ती युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (कोइरेंग) या संघटनेशी जोडलेली आहे. तर दुसरी मुतुम जोशिका चानू ही महिला कंगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी संघटनेशी जोडलेली आहे, असा तिच्यावर आरोप आहे. या दोघींचीही चौकशी केली जात आहे.

























































