
चीनने स्वयंचलित कार (सेल्फ-ड्रायव्हिंग) कार विक्रीची योजना सध्या थांबवली आहे. एका अपघातानंतर चीनने हा निर्णय घेतला. या वर्षी 29 मार्च रोजी सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कारमध्ये प्रवास करणाऱया 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी कारचा वेग 116 किमी प्रति तास होता. सध्या चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केवळ दोन कंपन्यांना बीजिंग ऑटोमोटिव्ह ग्रुप आणि चांगन ऑटोमोबाइलला लेव्हल-3 सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांच्या चाचणीची परवानगी दिली आहे. या कार केवळ बीजिंग आणि चोंगकिंगमधील काही निश्चित केलेल्या महामार्गांवरच धावू शकतील. म्हणजेच सेल्फ-ड्रायव्हिंग कारना सध्या फक्त चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.
स्मार्ट ड्रायव्हिंग शब्द वापरू नका
खरे तर चीनमध्ये सध्या फक्त लेव्हल-2 सिस्टम वापरात आहेत, ज्यात चालकाला प्रत्येक वेळी अधिक सतर्क राहावे लागते. मार्चमध्ये अपघात झालेल्या कारमध्ये लेव्हल-2 सिस्टम बसवलेली होती. अपघातानंतर सरकारने कार कंपन्यांना ‘स्मार्ट ड्रायव्हिंग’ किंवा ‘ऑटोनॉमस ड्रायव्हिंग’ यांसारख्या शब्दांचा वापर करण्यापासूनही रोखले आहे.





























































