
जगाच्या पाठीवर चीन प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. हिंदुस्थानसारख्या देशात अद्याप 5 जी इंटरनेट सेवा लाँच केली जात असताना चीनने मात्र 10 जी इंटरनेट सेवा लाँच करून आपण किती पुढे आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे. चीनने याच आठवडय़ात एक नवीन क्रू मिशन पाठवण्याची जोरदार तयारी केली आहे. या मिशनचे नाव आहे ‘शेनझाऊ-20 मिशन.’ हे मिशन उत्तर-पश्चिम चीनच्या जिऊ क्वान सॅटेलाईट लाँच सेंटरहून रवाना केले जाईल. या मिशनअंतर्गत तीन अंतराळवीर जवळपास सहा महिन्यांसाठी अंतराळातील चीनने बनवलेले तियांगोंग स्पेस स्टेशनवर थांबतील. चीनचे हे मिशन यशस्वी झाल्यास चीन 2030 मध्ये चंद्रावर अंतराळ प्रवासी उतरण्याची तयारी करणार आहे. चीन चंद्रावर एक बेस बनवणार आहे. चीनची ही टीम सहा महिने अंतराळ स्टेशनवर वेगवेगळे प्रयोग करणार आहे. चीनच्या अंतराळ एजन्सीने मागील आठवडय़ात म्हटले होते की, शेनझाऊ अंतराळ यान आणि त्याचे लाँच मार्च -2एफ कॅरिअर रॉकेटला जिऊ क्वान सॅटेलाईट लाँच सेंटरवरून पाठवणार आहे. योग्य वेळ येताच हे लाँच केले जाईल. शिन्हुआ स्टेट न्यूज एजन्सीने एक फोटो छापला असून यात निळ्या रंगाचा पेडस्टलवर पांढऱ्या रंगाचे रॉकेट दिसत आहे. ज्यावर चीनचा ध्वज लावलेले दिसत आहे. सध्या लाँचिंग साईटची सुविधा आणि उपकरण चांगल्या स्थितीत आहे. चीनने या मोहिमेबद्दल अद्याप सविस्तर माहिती उघड केली नाही. चीनने याआधी जे क्रू मिशन पाठवले होते, त्याचे नाव शेनझाऊ-19 होते. हे मिशन गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आले होते. या मिशनचे नेतृत्व चीनच्या वायुदलातील माजी पायलट कै जुजे यांनी केले होते.
चीनने ठरवले 2030चे लक्ष्य
चंद्रावर चीन व्यक्तींना उतरवण्यासाठी चीनने 2030 हे टार्गेट ठेवले आहे. 2030 पर्यंत चंद्रावर मानवयुक्त मिशन पाठवण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. चीनने अमेरिका आणि युरोपच्या बरोबरीने एक अत्याधुनिक अंतराळ कार्यक्रम विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. 2019 मध्ये चांग ई – 4 प्रोबला चंद्राच्या सुदुर भागात उतरवले होते, तर 2021 मध्ये मंगळ ग्रहावर एक छोटा रोबोट उतरवला होता.