चिन्यांची आकाशातून टेहळणी? कर्नाटक किनारपट्टीवर ‘जीपीएस’ ट्रॅकर असलेला सीगल पक्षी सापडला; सुरक्षेबाबत तर्कवितर्क

chinese gps tracker found on injured seagull at karnataka coast

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार किनारपट्टीवर ‘जीपीएस’ (GPS) ट्रॅकर लावलेला एक जखमी सीगल पक्षी सापडला आहे. हा पक्षी चिनी संशोधन संस्थेशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कारवारमधील रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी कोस्टल मरीन पोलिस सेलला हा जखमी सीगल आढळला. पोलिसांनी या पक्षाला तात्काळ वन विभागाच्या स्वाधीन केले. तपासणी दरम्यान, या पक्षाच्या शरीराला एक लहान इलेक्ट्रॉनिक युनिट आणि सोलर पॅनेल असलेला जीपीएस ट्रॅकर बांधलेला असल्याचे दिसून आले.

चीनमधील संस्थेशी संबंध या ट्रॅकरवर एक ईमेल आयडी आणि संदेश लिहिलेला होता, ज्यामध्ये पक्षी सापडल्यास संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल आयडी चीनमधील ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’ (Research Centre for Eco-Environmental Sciences) या संस्थेशी संबंधित आहे. प्रशासन आता या ईमेल आयडीवर संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू कारवारमध्ये भारताचा अत्यंत महत्त्वाचा नौदल तळ असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. “हा पक्षी स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासासाठी सुरू असलेल्या एखाद्या वैज्ञानिक प्रकल्पाचा भाग असू शकतो, यासह इतर सर्व बाजूंची पडताळणी केली जात आहे,” असे उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक दीपा एन. एम. यांनी सांगितले.