चिपळूणातील उड्डाणपुलासाठी मार्च 2026 चा मुहूर्त, गर्डर चढविण्याचे काम वेगाने सुरू

चिपळूणातील उड्डाणपुलासाठी मार्च 2026 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून गर्डर चढविण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती आली आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीत मार्च 2026 पूर्वी पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी जुने पिअर कॅप तोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आता नवीन पिअर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला असून पुलाच्या एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 32 गर्डर चढविण्यात यश आले असून दोन क्रेनच्या सहाय्याने हे काम वेगाने केले जात आहे.

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे–परशुराम ते खेरशेत या 34 किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाची लांबी साधारणपणे 1840 मीटर तर रुंदी 45 मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण 46 पिलर्स उभारण्यात आले आहेत. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात आले होते. मात्र 16 ऑक्टोबर 2023 रोजी पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. तत्काळ केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या समितीच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाच्या डिझाइनमध्ये बदल सुचवले होते.

पूर्वी पुलाच्या उभारणीत 40 मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यातील अंतर कमी करून ते आता 20 मीटरवर आणण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त पिअर उभारण्यात आले आहेत. नवीन रचनेनुसार पुलाचे काम सुरू असून पिअर कॅप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण 95 पिअर कॅपपैकी अर्ध्याहून अधिक पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. उर्वरित पिअर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून महिनाभरात 32 गर्डर चढविण्यात आले आहेत.

उर्वरित कामासाठी किमान 9 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मार्च 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील चिपळूण हद्दीतील पाग पॉवरहाऊस येथील चौकातून ये–जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. सततच्या अपघातांमुळे हा चौक भविष्यात अत्यंत धोकादायक ठिकाण म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.