सिडकोचा बुलडोझर सुपरफास्ट, भूमाफियांचे कंबरडे मोडले; आठ तासांत 10 हजार चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सिडकोचा बुलडोझर सुपरफास्ट निघाला आहे. अतिक्रमणविरोधी पथकाने आज एकाच दिवशी आठ तासांत कामोठे, द्रोणागिरी नोडमध्ये तीन बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई करून सुमारे 10 हजार चौरस मीटरचा भूखंड रिकामा केला. दोन ते तीन मजल्यांपर्यंत वर चढलेले बांधकाम जमीनदोस्त झाल्याने भूमाफियांचे कंबरडे मोडले आहे. या धडक कारवाईमुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात फिफ्टी फिफ्टीमध्ये बांधकाम करणाऱ्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.

कामोठे येथील सेक्टर 47 मध्ये दोन इमारतींचे बांधकाम अनधिकृतरीत्या सुरू होते. या दोन्ही इमारतींवर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज धडक कारवाई करण्यात आली. दोन ते तीन मजल्यांपर्यंत बांधकाम झालेल्या या दोन्ही इमारतींवर बुलडोझर चालवला गेला. या दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत दोन हजार चौरस मीटर भूखंड भूमाफियांच्या कब्जातून सोडवण्यात आला आहे. द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 1 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. या अतिक्रमणावरही आज धडक कारवाई करून सुमारे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड रिकामा करण्यात आला.