सीआयएसएफ महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास, ‘ती’नं करून दाखवलं माऊंट एव्हरेस्ट सर!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या महिला उपनिरीक्षक गीता समोटा यांनी मंगळवारी इतिहास रचला आहे. गीता यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून दाखवले आहे. माऊंट एव्हरेस्ट हे 8849 मीटर उंच म्हणजेच जवळपास 29,032 फूट उंचावर आहे. अशी किमया करणारी गीता समोटा ही सीआयएसएफची पहिली महिला अधिकारी ठरली आहे. मूळची राजस्थानच्या सीकर जिह्यातील असलेल्या गीताचे प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण स्थानिक संस्थेत झाले आहे. कॉलेजमध्ये हॉकी खेळण्याची आवड असलेल्या गीता यांनी जखमी झाल्यानंतर हा खेळ थांबवला. 2011 मध्ये गीताची निवड सीआयएसएफमध्ये झाली. भारत-तिबेट सीमा पोलीस प्रशिक्षण संस्थेत पर्वतारोहणसाठी गीताची निवड करण्यात आली होती. 2017 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. गीता समोटा यांनी याआधी उत्तराखंडच्या माऊंट सतोपंथ आणि नेपाळच्या माऊंट लोबुचेसुद्धा यशस्वीपणे सर केले आहे. सीआयएसएफ मोहिमेत असे करणारी गीता ही पहिली महिला ठरली होती. 2021 मध्ये माऊंट एव्हरेस्टसाठी गीता यांची निवड करण्यात आली होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

गीता समोटा यांनी सात महाद्वीप शिखर सर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यातील 4 शिखर त्यांनी सर केले आहेत. यासाठी त्यांनी केवळ 6 महिने 27 दिवस घेतले आहेत. लडाखच्या रुपशू क्षेत्रात गीता यांनी 3 दिवसांत पाच शिखर सर केले आहेत. गीता यांना दिल्ली महिला आयोगाकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 2023 पुरस्कार देण्यात आला. नागरी वाहतूक मंत्रालयाकडून गिविंग विंग्स टू ड्रीम्स अवॉर्ड 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.