
ऐन उन्हाळ्यात नेरळवासीयांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. ग्रामपंचायतीने 80 लाखांचे पाणी बिल थकवल्याने महावितरणने पाणी योजनेची वीज कापली. त्यामुळे 24 हजार नेरळवासीयांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था रहिवाशांची झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संतप्त ग्रामस्थ बुधवारी ग्रामपंचायतीवर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीमधून सहा विभागांना पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 1998 मध्ये उल्हास नदीवर योजना राबवून नेरळ गावात पाणी आणले. बोर्ले येथे असलेल्या उदंचन केंद्रातून पाणी उचलण्यासाठी वीज वापरली जाते. मात्र ग्रामपंचायतीने 80 लाखांचे बिल थकवल्याने महावितरणने सोमवारी पाणी योजनेची वीज कापली. त्यामुळे नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात माता-भगिनींना वणवण करावी लागत असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे हात वर
उल्हास नदी जवळ असतानाही नेरळकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ‘नागरिकांनी पाणी बिल भरले नाही, त्यामुळे वसुली झाली नाही,’ असे अजब उत्तर देऊन त्यांनी आपले हात वर केले आहेत. आम्ही वेळेवर पाणी बिल भरतो तरी आम्हाला पाणी का मिळत नाही असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला जाईल असा इशारा हेटकरआळी येथील महिला मंडळाने दिला आहे.



























































