
बिहार, राजस्थानसह मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात तसेच वीज कोसळून एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. राजस्थानात एका दिवसात विविध घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशात रविवारी अनेक जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, महापूर, भूस्खलनामुळे मान्सून दाखल झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 98 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात विविध घटनांध्ये 770 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडी येथे चंदिगड-मनाली महामार्ग भूस्खलनामुळे पुन्हा बंद ठेवण्यात आला. उत्तर प्रदेशात नद्यांना पूर आला आहे. ललितपूर येथील गोविंद सागर धरणाचे 17 दरवाजे खोलण्यात आले आहेत.
वाराणसीत गंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रत्नेश्वर महादेव मंदिर 80 टक्के बुडाले आहे, तर भगवान बुद्धांच्या 80 फूट प्रतिमेवर वीज कोसळल्यामुळे या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले.