जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, कठुआ जिह्यात निसर्गाचा कोप; सात जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी

जम्मूकश्मीर आणि हिमाचल प्रदेशात रविवारी सकाळी ढगफुटी झाली. गेल्या तीन दिवसांत जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटीची ही दुसरी घटना आहे. कठुआ जिह्यात सीमेला लागून असलेल्या परिसरात आज तीन ठिकाणी ढगफुटी झाली. जोद व्हॅली परिसरात सात जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. जोदव्यतिरिक्त माथेर चक, बगारड-चांगडा आणि दिलवान-हुटली येथेही भूस्खलन झाले.

14 ऑगस्ट रोजी जम्मू-कश्मीरमधील किश्तवाडच्या चसोटी येथेही अशीच एक घटना घडली. भूस्खलनानंतर जोद गाव शहरापासून तुटले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर बचाव पथक गावात पोहोचले. घरे अनेक फूट उंचीपर्यंत पाण्याने आणि ढिगाऱ्याने भरली आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कठुआचे डेप्युटी एसपी राजेश शर्मा म्हणाले, ‘‘भूस्खलनात दोन ते तीन घरांचे नुकसान झाले. सहा लोक अडकल्याचे समजते. जंगलोटसह राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे नुकसान झाले आहे. रेल्वे ट्रकदेखील विस्कळीत झाला आहे.’’

पुढील तीन दिवस मुसळधार  

< हवामान खात्याने 17 ते 19 ऑगस्टदरम्यान जम्मू आणि कश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, राजौरी, पूंछ, सांबा, कठुआ, दोडा, किश्तवार, रामबन आणि कश्मीरच्या काही भागांत ढगफुटी व भूस्खलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.

< रविवारी पहाटे 4 वाजता पुल्लूच्या शालनाला येथे ढग फुटले. यामुळे कुल्लू आणि मंडीच्या अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे टाकोली सब्जी आणि टाकोली पह्रलेनवर ढिगारा पडला आहे. कुल्लू-मंडीच्या वेगवेगळ्या भागांत दहाहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरे ढिगाऱ्यांनी भरली आहेत.

वैष्णोदेवी यात्रेला ब्रेक; कटरा येथे प्रवासी अडकले

जम्मू-कश्मीरमधील खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अनेक भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून रस्ते बंद आहेत. अनेक भागात पर्यटक अडपून पडलेले आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  भाविकांना कटरा येथेच थांबण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.