
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोसमध्ये दाखल झाले. यापूर्वीही त्यांनी दावोस दौरा केला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात गुंतवणूक झालीच नाही. आज 16 लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवून ते पुन्हा एकदा दावोसला गेले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावोस दौरा पाच दिवसांचा आहे. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि काही प्रमुख उद्योगपतीही या दौऱयात आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱया या दौऱयात महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.
मागील वर्षीही दावोसमध्ये राज्य सरकारकडून तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 72 टक्के करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. यंदाच्या परिषदेचे प्रमुख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असणार आहेत.
10 राज्यांचे मुख्यमंत्री दावोसमध्ये
महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांचे मुख्यमंत्री दावोस दौऱयावर गेले आहेत. व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पुरवठा साखळी क्षेत्रात हिंदुस्थानची भूमिका अधिक बळकट करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
























































