
ऑक्सिस बँकेत खाते उघडण्यासाठी पोलिसांना धमकावले जाते आणि प्रत्येक खात्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 300 रुपये मिळतात असा दावा करून निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.
कुख्यात वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला देण्यात आली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी कासले याने केला होता. त्यानंतर निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या माणसाने आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचेही कासले याने म्हटले होते. आता सोशल मीडियावर त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमृता फडणवीस या ऑक्सिस बँकेत अधिकारी आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर ऑक्सिस बँकेतच खाते उघडण्यासाठी दबाव आणला जातो. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असे मिळून 3 ते 4 लाख अकाऊंट होतात, मग अमृता फडणवीस यांना प्रत्येक अकाऊंटमागे 300 रुपये मिळाले तर जवळपास दहा कोटी रुपये होतात आणि याला पुराव्याची गरज नाही, असे कासले याने व्हिडीओत म्हटले आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी कासले याने केलेले आरोप फेटाळले आहेत.