
कोका-कोला इंडियाची बॉटलिंग ब्रँच असलेल्या हिंदुस्थान कोका-कोला बेवरेजेस (एचसीसीबी) कंपनीने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. हा निर्णय गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना कळवण्यात आला आहे. नफा वाढवण्यासाठी आणि आपले कामकाज सुरळीत करण्यासाठी अंतर्गत उपाययोजना म्हणून हे पाऊल कंपनीने उचलले आहे.
हिंदुस्थान कोका-कोला बेवरेजेसचे सध्या देशभरात 15 उत्पादन प्लांट्स आहेत आणि त्यामध्ये सुमारे 5,000 कर्मचारी काम करतात. हे प्लांट्स कोका-कोला, थम्स अप, स्प्राइट, मिनिट मेड आणि किन्ले वॉटर यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सची बॉटलिंग व वितरण करतात. ‘विकसित होत असलेल्या व्यावसायिक गरजांशी सुसंगत राहण्यासाठी आम्हाला कर्मचारी संख्या आणि कामकाजाच्या पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कर्मचारी कपात किरकोळ असून कामकाजात कोणताही व्यत्यय आणणारी नाही. स्पर्धात्मक आणि कार्यक्षम राहण्यासाठी आम्ही वेळोवेळी व्यावसायिक कामकाजाचे मूल्यांकन करतो,’ असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
सुमारे 4–6 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. ही कपात विक्री, पुरवठा साखळी, वितरण आणि प्लांट्समधील बॉटलिंग विभागासह विविध विभागांमध्ये केली जाणार आहे.
2025 मधील नफ्यात 73 टक्के घट
हिंदुस्थान कोका-कोला बेवरेजेसने आर्थिक वर्ष 2025 मध्ये निव्वळ नफ्यात 73 टक्के घट नोंदवली आहे. त्यांनी 756.64 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कोका-कोला भारतात फ्रँचायझी पद्धतीने व्यवसाय करते. ते आपल्या बॉटलिंग भागीदारांना पेयांचे कॉन्सन्ट्रेट विकते, जे नंतर आपापल्या भागात पेये तयार करतात आणि त्यांचे वितरण करतात.






























































