वंदे भारत ट्रेनचा भोंगळ कारभार! प्रवाशांच्या जेवणात सापडले झुरळ

वंदे भारत ट्रेनमध्ये पुन्हा एकदा निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका जोडप्याच्या जेवणात झुरळ आढळून आले आहेत. हे जोडपे 18 जून रोजी भोपाळहून आग्रा असा प्रवास करत होते. त्यांच्या पुतण्याने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. याप्रकरणी रेल्वेकडे तक्रारही करण्यात आली असून प्रवाशांकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रविवारी एक जोडपे आपल्या पुतण्यासोबत भोपाळहून आग्राला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी त्यांना दुपारच्या जेवणात झूरळ आढळून आले. याबाबत या जोडप्याच्या पुतण्याने रेल्वेतील अधिकार्यांकडे तक्रार केली. तसेच याबाबत सोशल मीडियावरही त्याने काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहे. माझे काका काकू वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी त्यांना जेवणात झुरळ आढळून आले आहे. यामुळे प्रवाशांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. माझी रेल्वे प्रशासनाला विनंती आहे कृपया विक्रेत्यावर कडक कारवाई करा आणि असे पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असे त्याने या पोस्टमध्य़े लिहिले आहे.

IRCTC ने गुरुवारी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी संबंधितांवर दंड ठोठावण्यात आला असून कडक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्हाला खेद वाटतो. मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले आहे आणि संबंधित सेवा अधिकार्यावर योग्य तो दंड ठोठावण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदुस्थानातील सर्वात उच्च दर्जाच्या रेल्वेत देखील हे प्रकार घडत असलीत. तर हे खूपच गंभीर आहे. अशी चिंता एका युजरने व्यक्त केली आहे. वंदे भारत ट्रेनमधील ही पहिलीच घटना नसून फेब्रुवारीमध्येही एका प्रवाशाच्या अन्नात झुरळ आढळले होते.