
गेल्या काही आठवड्यांपासून परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे नागरिक हैराण झाले होते. आता पावसाच्या सर्व शक्यता ओसरल्या असून हवामान हळूहळू शुष्क व कोरडे होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यभरात किमान तापमान घटण्यास सुरुवात झाली असून पुढील तीन ते चार दिवसांत हळूहळू 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात घट होईल. मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. शनिवारी कुलाबा येथे 23.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ येथे 21.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि वाढलेल्या हवेच्या दाबामुळे उत्तर-पूर्वेकडून थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहेत. यामुळे तापमानात घट होत असून थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. विदर्भात धुक्याचे प्रमाण वाढत असून किमान तापमानात वेगाने घसरण होत आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जळगावचा पारा 10 अंशांवर
शनिवारी नाशिक येथे 13.4 अंश सेल्सिअस, सांगलीत 18 अंश सेल्सिअस, जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 13.5 अंश सेल्सिअस, परभणीमध्ये 14.4 अंश सेल्सिअस आणि डहाणू येथे 19.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.




























































