
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह 7 उपजिल्हाधिकाऱ्यांनी एकाचवेळी जिल्हय़ातील सर्व तहसील कार्यालयांची अचानक झाडाझडती घेतली. यामध्ये 19 नायब तहसीलदार, तर 134 कर्मचारी चक्क गैरहजर असल्याचे आढळले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या दांडीबहाद्दरांचे एक दिवसाचे वेतन कपात करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः फुलंब्री तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली. यासाठी त्यांनी दैनंदिन वेशभूषा बदलून जीन्स पँट आणि शर्ट परिधान केला होता. त्यांचे शासकीय वाहनही त्यांनी तहसील कार्यालयापासून दूर अंतरावर उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपली ओळख तहसीलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पटू नये, यासाठी ही वेशभूषा बदलल्याचे त्यांनी ‘सामना’ शी बोलताना सांगितले.