
विलेपार्ले पूर्व येथील केरळ आयुर्वेदिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. देविका देशमुख यांचा ‘वेलनेस वेनस्डे’ या आयुर्वेद व फिटनेसवरील कार्यक्रमाचा 175वा एपिसोड बुधवारी दिमाखदार पद्धतीने येथे साजरा झाला. विलेपार्ले पूर्व येथे रंगलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा एपिसोड रसिकांना लाइव्ह पाहण्याचीदेखील संधी मिळाली.
आयुर्वेद व योग याची सांगड घालून आपले स्वास्थ्य उत्तमरीत्या कसे राखता येईल, आयुर्वेदातील वेगवेगळे उपचार आणि रोजच्या जगण्यातील महत्त्वाचे बदल, मानसिक संतुलन कसे राखावे याविषयी माहिती देणारे डॉ. देविका देशमुख यांचे व्हिडीओ गेली चार वर्षे फेसबुक इंस्टाग्राम व यूटय़ूबवर प्रसारित होत आहेत. नवनवीन संकल्पना त्या आपल्या प्रेक्षकांना अगदी साध्या भाषेत समजावून सांगतात. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. 175 व्या एपिसोडनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री विभावरी प्रधान, योग प्रशिक्षक शुभम श्री, डॉ. रमेश देशमुख आणि डॉ. शुभदा देशमुख, डॉ. सुश्रुत देशमुख, कीर्ती जोशी, डॉ. गिरीश बोरुडे आदी उपस्थित होते.