
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. सरकारने 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली असून, हे नवे दर आज 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांचे आर्थिक बजेट कोलमडणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. कमर्शियल गॅस महागल्यामुळे आता बाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीत आता कमर्शियल सिलिंडर 1740.50 रुपयांना मिळणार आहे, जो यापूर्वी 1691.50 रुपयांना मिळत होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत या सिलिंडरची किंमत 1642.50 रुपयांवरून थेट 1692 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच कोलकातामध्ये 1844.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1899.50 रुपये इतका नवीन दर निश्चित करण्यात आला आहे. सणासुदीच्या आणि अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही वाढ व्यावसायिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
एकीकडे कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली असली, तरी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून स्थिर आहेत. सध्या दिल्लीत घरगुती सिलिंडर 853 रुपयांना मिळत असून मुंबईत 852.50, कोलकातामध्ये 879 आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती गॅसच्या किमती न वाढल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असला, तरी हॉटेलमधील दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बाहेरचे जेवण मात्र नक्कीच महागणार आहे.























































