व्यावसायिक सिलिंडर 39 रुपयांनी महागला, सणासुदीत व्यावसायिकांना फटका; हॉटेलिंग महागणार

गणेशोत्सव तोंडावर आला असताना महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरचे दर 39 रुपयांनी वाढले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून वाढ झाली असून हे नवीन दर आजपासून लागू झाले. या दरवाढीचा फटका देशभरातील छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना बसला असून याचा परिणाम सर्वसामान्यांनाही भोगावा लागणार आहे. या दरवाढीमुळे हॉटेलिंगही महागण्याची शक्यता आहे.

नवीन दरानुसार आता 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 1 हजार 691 रुपयांना मिळणार आहे. तेल पंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानतंर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल पंपन्यांनी फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरातच वाढ केली असून घरगुती 14 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जुलैमध्ये दरात झाली होती कपात

जुलैमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली होती. जुलैमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र आता सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.