आयुक्तांचा शिस्तीचा धडा, पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे!

deven bharti mumbai police commissioner

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशी सौजन्याने वागा आणि पोलिसांची प्रतिमा सुधारा, अशा सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना आपल्या आठवड्याच्या गुन्हे आढावा बैठकीत दिल्या.

पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, कोणताही नागरिक हौसेने पोलीस ठाण्यात जात नाही. त्याला त्रास होतो. त्याने काहीतरी गमावलेले असते. अगदी हरवलेल्या मोबाईलचीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली पाहिजे. टाळाटाळ करता कामा नये. कोणत्याही तक्रारदाराला पोलीस ठाण्यात फेऱ्या मारायला लावणे म्हणजे पोलिसांविषयी गैरसमज पसरविण्यासारखे, त्यांची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे. असे यापुढे होता कामा नये. पोलिसांविषयी तक्रार आल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल असेही पोलीस आयुक्तांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना बजावले.