विनाआरक्षण करता येणार एक्सप्रेसची सफर, आयआरसीटीसीची प्रवाशांना अनोखी भेट

रेल्वे प्रवाशांना आता विनाआरक्षण एक्सप्रेसची सफर करता येणार आहे. हिंदुस्थान रेल्वेने काही एक्सप्रेस गाडय़ांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ऐन वेळी तिकीट कन्फर्म होण्याची वाट न बघता थेट ट्रेन पकडता येणार आहे.

आरक्षण नसताना प्रवास केल्यास प्रवाशाला दंड ठोठावला जातो. काही वेळा तर एक्सप्रेसमधून खाली उतरावे लागते. दरवर्षी अशा लाखो प्रवाशांकडून रेल्वे दंड वसूल करते. मात्र काहींचा प्रवास ऐन वेळी ठरतो. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही एक्सप्रेस विनाआरक्षण सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

काही एक्सप्रेसमधील काही डब्यांमध्ये थेट तिकीट काढून प्रवास करता येतो. या डब्यांमध्ये तुफान गर्दी असते. याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. रेल्वेच्या या नवीन उपक्रमामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील. प्रवास अधिक सुखकर होईल.

 

या एक्सप्रेस धावणार विना आरक्षण

अहमदाबाद- सुरत,पटना-गया, जयपूर-अजमेर, चेन्नई-बंगलोर व भोपाल-इंदौर एक्सप्रेसचा प्रवास विनाआरक्षण करता येणार आहे.

 

मुंबईपुणे प्रवासाची पर्वणी

मुंबई-पुणे सुपरफास्ट  ट्रेनमध्ये आता विनाआरक्षण प्रवास करता येणार आहे. ही एक्सप्रेस सकाळी साडेसात वाजता मुंबई येथून सुटते. साडेतीन तासांचा प्रवास करून अकरा वाजता ती पुण्यात दाखल होते. हैदराबाद-विजयवाडा एक्सप्रेसचे आरक्षणही रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांना थेट तिकीट काढून या एक्सप्रेसने प्रवास करता येणार आहे.