महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे बंद होण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गजानन चेणगे, सातारा

इराण व इस्रायल-अमेरिका यांच्यात भडकलेल्या युद्धाची धग आपल्या दारापर्यंत आली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प होण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे शहरातीलच नव्हे, तर महामार्गावरील हॉटेल्स, धाबेचालकांना कोणत्याहीक्षणी शटर खाली ओढावी लागतील, अशी भीती सतावत आहे. परिणामी, महामार्गावरून जाणाऱया वाहतूकदारांसह प्रवाशांना अन्न पाणी कसे मिळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आखाती देश जगाचा इंधन पुरवठय़ाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा फास आवळल्यामुळे जगभरातील अनेक देशांपुढे इंधन टंचाईचे संकट उभे राहिले आहे. याची धग आता थेट आपल्या दारापर्यंत आली असून, सामान्य माणूसही या संकटामुळे कासावीस झाला आहे. पेट्रोल, डिझेलसह गॅस टंचाईच्या धास्तीमुळे लोकांच्या पोटात गोळा आला आहे. अशात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांनी, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीची टांगती तलवार आहेच.

अशा स्थितीत किमान घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा म्हणून सरकारने ‘मेस्मा’ लागू केला आहे. त्याचवेळी व्यावसायिक सिलिंडर मिळण्याची शाश्वती राहिलेली दिसत नाही. सातारा जिह्यात सध्या गॅस वितरकांकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा जवळपास संपत आला आहे.  हॉटेल तसेच धाबेचालकांचा भटारखाना अखंड सुरू राहत असल्याने 19 किलोचा एक सिलिंडर दिवसाला खर्ची पडत आहे. महामार्गासह जिल्ह्याभरात हॉटेल व धाब्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. वडापाव, स्नॅक्स आणि चहाच्या टपरीलाही व्यावसायिक गॅस सिलिंडर लागत असतो. या व्यावसायिकांची प्रचंड मागणी विचारात घेतली तर कोणत्याही क्षणी जिह्यातील व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प होऊन हॉटेल व्यावसायिकांना शटर खाली ओढण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी भीती आहे. हॉटेल ठप्प झाल्यास महामार्गासह प्रमुख मार्गावरून प्रवाशांना अन्न-पाणी कसे मिळणार, हा प्रश्न आहे.

जगाला टेन्शन! नेटकरी मात्र विनोदाच्या धुंदीत

युद्धाचे जगाला टेन्शन असताना सोशल मीडियावर मात्र नेटकऱयांना विनोद सुचत आहेत. त्यामुळे युद्धजन्य स्थितीमुळे नकारात्मक मानसिकतेत गेलेल्यांचा मूड चांगला होण्यास हातभार लागत आहे. महामार्गावरून प्रवास करताना ‘चुलीवरचं जेवण’ लिहिलेले हार्ंडग्ज लक्ष वेधून घेतात. त्या अनुषंगाने ‘चुलीवरचं जेवण’ अशा पाटय़ा लावणारी हॉटेल्स जर गॅस टंचाई असताना बंद झाली, तर समजून जा ते गिऱहाईकांना येडय़ात काढत होते, अशा पोस्ट व्हायरल होत असून, लोकही त्याचा आनंद घेत आहेत. त्यावर, इथे चाललंय काय आणि यांचं काय? अशा कमेंट्स नेटकऱयांकडून होत आहेत.

पर्यटनावर विपरित परिणाम

युद्ध परिस्थितीमुळे सगळेच चिंतेत आहेत. त्यातच व्यावसायिक गॅसच्या तुटवडय़ाची चिन्हे दिसू लागली आहेत. महाबळेश्वर-पाचगणीला राज्यातून तसेच परराज्यांतून हजारो पर्यटक येतात. त्यामुळे येथे हॉटेल व्यवसाय मोठा आहे. पण गॅस टंचाईमुळे खाण्यापिण्याची समस्या निर्माण होण्याच्या भीतीमुळे पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होऊ शकतो. – राकेश सकपाळ, हॉटेल व्यावसायिक, महाबळेश्वर.

अजून तरी व्यवस्थित सुरू आहे

काही हॉटेल व्यावसायिकांकडे सध्या उपलब्ध असलेल्या गॅस सिलिंडरमुळे अजून तरी व्यवस्थित सुरू आहे. वितरकांकडील व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा मर्यादित आहे. तो कधीही संपू शकतो. त्यांना कंपन्यांकडून अतिरिक्त साठा मिळण्यावरच हॉटेल व्यवसायाचे या संकटातील अस्तित्व अवलंबून राहणार आहे. – चंद्रसेन जाधव, हॉटेल व्यवसायिक, सातारा