हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत विदारक, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीने दाखवला आरसा

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते, परंतु त्यांचे आयुष्य अर्धे झाले, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुनावल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या अध्यक्षांनी हिंदुस्थानातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत विदारक असल्याचे म्हटले आहे. त्यांची ही स्थिती सुधारण्यासाठी तब्बल 75 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणुकीची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

हिंदुस्थानातील लहरी हवामानामुळे देशातील शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत शेती करावी लागत आहे. या स्थितीचा सामना करून शेती व्यवस्था सुधारण्यासाठी 75 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे अध्यक्ष अल्वारो लारियो यांनी म्हटले आहे.