
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोमध्ये एका खासगी टीव्ही चॅनेलला मुलाखत देऊन शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या तक्रारीची आयोगाने दखल घेतल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केला आहे.
मेट्रोमध्ये मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुरक्षा बंदोबस्त होता. त्यांनी निवडणूक प्रचारात्मक स्वरूपाची मुलाखत दिली. हे सर्व मुद्दे निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, समान संधी आणि लोकशाही मूल्यांशी थेट संबंधित आहेत, असे काँग्रेसने तक्रारीत नमूद केले आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांना सविस्तर पत्र पाठवण्यात आले असून, त्यामध्ये तक्रारीतील मुद्दे, सादर केलेले व्हिडीओ पुरावे आणि कायदेशीर बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. ही तक्रार आणि त्यासोबतच्या पुराव्यांची प्राथमिक छाननी करून राज्य निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवले आहे.





























































