
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला काँग्रेसच्या वतीने हायकोर्टात आव्हान दिले आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्यात यावी तसेच याचिका कायद्यानुसार दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद काँग्रेसने न्यायालयात केला आहे. याचिकाकर्त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल करून घेत न्यायालयाने या प्रकारणावरील निकाल राखून ठेवला.
फडणवीस यांच्या निवडीविरोधात काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्ते गुडधे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महमूद प्राचा यांनी हायकोर्टात लेखी युक्तिवाद सादर केला. तसेच फडणवीस यांची आमदारकी व इतर आमदारांची निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला.
याचिकेला विरोध
फडणवीस यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांनी बाजू मांडताना या निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार नियम 11 आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 86 (1) अंतर्गत विरोध केला. या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 81 (1) मधील निकष पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे त्या सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावा, अशी विनंती फडणवीस यांनी केली.