
काँग्रेसडून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन व सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र लिहून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना लोकशाहीवादी, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरण असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर प्रशासनावर दबाव आणत असून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले जात असल्याची माहिती मिळत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही प्रक्रियेवर परिणाम करणारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुंबईतील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 229 मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मुकुंद नार्वेकर, पत्नी गीता नार्वेकर आणि वहिनी हर्षा नार्वेकर उमेदवारी दाखल करत असल्याचे पत्रात नमूद आहे. उमेदवारी प्रक्रियेत राहुल नार्वेकर स्वतः हस्तक्षेप करत असल्याचा आणि विरोधी उमेदवारांवर दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
संवैधानिक पदावर असताना राहुल नार्वेकर यांनी आचारसंहितेचा भंग केला असून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील सुमारे 70 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे अत्यंत गांभीर्याचे असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, संवैधानिक पदावरील व्यक्तीकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर त्याचा निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
तसेच मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तात्काळ व गांभीर्याने पावले उचलावीत, अशी अपेक्षाही काँग्रेसने व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आ.निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा अजून मजबूत आहे हे आपण… pic.twitter.com/5q5CizXeJd
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) January 2, 2026




























































