Congress पाच फुटीर आमदारांचं तिकीट कापणार? नव्या उमेदवारांना संधी देण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश, सूत्रांची माहिती

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवणुकीत काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी स्वपक्षाचे आदेश धुडकावत क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फुटलेल्या या आमदारांवर कडक कारवाईचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतल्याचे कळते आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या पाच आमदारांचं तिकीट कापून नवीन उमेदवारांना तिथे संधी देण्यात यावं असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांना पक्ष श्रेष्ठींकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी किती स्पष्टतेने आणि तयारीनिशी उतरत असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीनं यासंदर्भातील वृत्त प्रसारित केलं आहे. विधान परिषद निवडणुकांवेळी क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर आलं होतं. हे आमदार काँग्रेसचे असल्याचे आरोप झाले. त्यानंतर 19 जुलैला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दिल्लीतून वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल राव आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित होते. एका समितीची स्थापना करून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्याच समितीच्या निर्णयानंतर फुटीर पाच आमदारांना तिकीट नाकारून त्याजागी निष्टावंतांना संधी देण्याचा निर्णय झाल्याचं खासगी वृत्त वाहिनीवरून सांगण्यात आलं आहे.