तत्काळ माफी मागा, कंगना रणौत विरोधात काँग्रेस आक्रमक; पोलिसात तक्रार दाखल

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर तेलंगणमधील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने कंगना विरोधात थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

कंगना राणौत राहुल गांधी बाबत बोलली होती की, कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्यावर अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. यावरून आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत तेलंगणातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते हनुमंत राव यांवी कंगना राणौत विरोधात हैद्राबाद येथील अंबरपेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप लावणे चुकीचे आहे. जर भाजपने अशा प्रकारच्या लोकांना प्रोत्साहन दिले तर त्यांना पळवून लावू. कंगनावर लगाम आणण्याची जबाबदारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची आहे.

कंगनाने केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. तिने राहुल गांधी, गरीब आणि मागास नागरिकांचा अपमान केला आहे. या वक्तव्यासाठी तिने तत्काळ राहुल गांधी यांची माफी मागावी. कंगनाच्या वक्तव्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे काँग्रेस नेते हनुमंत राव म्हणाले. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांकडे कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही हनुमंत राव यांनी केली आहे.