ठाणे महापालिका भ्रष्टाचाराचा गड, काँग्रेसचा आरोप; लाचखोरांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना १५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अॅण्टी करप्शन ब्युरोने अटक केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका भ्रष्टाचाराचा गड बनला असून या गैरकारभाराला अभय देणाऱ्या सूत्रधारांवर कारवाई करणार का? असा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे. दरम्यान, पालिकेतील सार्वजनिक बांधकाम, स्थावर मालमत्ता, घनकचरा व शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार असून आयुक्त सौरभ राव यांनी राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोल न उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुख्यालयातून एसीबीने उचलले. बडा मासा हाती लागल्याने अन्य अधिकाऱ्यांची तंतरली आहे. चौकशी सुरू झाली तर आपला नंबर लागणार नाही ना, या भीतीने अधिकाऱ्यांची गाळण उडाली असून पाटोळे प्रकरणानंतर अधिकारी आणि कर्मचारी सावध झाले आहेत. या लाचखोरीच्या विरोधात ठाणेकर जनतेमध्ये प्रचंड संताप असल्याचे दिसून आले. पाटोळे यांना एसीबीचे अधिकारी अटक करून घेऊन जात असताना या अधिकाऱ्यांवर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाटोळे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

‘कलेक्टर’ सुर्वेला अटक 

ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांचा ‘कलेक्टर’ सुशांत सुर्वेला अखेर आज अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून सुर्वेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता ठाणे एसीबी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

पाटोळे यांच्या चौकशीची मागणी 

ठाण्यातील रस्ते, मेट्रो, सॅटिस यासारखी विकासकामे करण्यासाठी सरकारने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाणे महापालिकेला ९५० कोटी रुपये दिले आहेत, पण अधिकारी लाचखोरीमध्ये व्यस्त असल्याने हे पैसे नेमके कोणाच्या घशात गेले? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे. पाटोळे यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती अशी माहिती पिंगळे यांनी दिली.